शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक पाठ्यपुस्तकांची अद्याप 50 टक्केच छपाई झालेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना यावेळी देखील पुस्तके मिळण्यास अधिक विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तथापि गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही कोरोनाच्या संकटामुळे पुस्तकांच्या छपाईसाठी विलंब झाला आहे.
आतापर्यंत फक्त 50 टक्के पुस्तकांची छपाई झाल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अजून कांही दिवस पाठ्यपुस्तके मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर आठ ते दहा दिवसात विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जात होते. मात्र लॉकडाउन व कोरोनाच्या संकटामुळे प्रिंटींग प्रेस बंद असल्याने पुस्तकांची वेळेत छपाई होण्यास विलंब झाला आहे.
दरम्यान, पाठ्यपुस्तकं वितरणास विलंब होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने सर्व शाळांना बुक बँक सुरू करण्याची सूचना केली आहे.
त्याला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जमा झालेली पुस्तके लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जातील, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.