सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पंतप्रधानांना मोठ्याप्रमाणात पत्रे पाठवली जाणार आहे. या मोहिमेला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला असून मोठ्या संख्येने पत्र काढण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन तालुका समितीतर्फे करण्यात आले आहे.
भाषावार प्रांतरचना करतेवेळी सीमाभागातील 40 लाख मराठी जनतेला अन्यायाने तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आले. तेव्हापासून सीमा भागातील जनता गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी सनदशीर लोकशाही मार्गाने लढा देत आहे. तरीही कर्नाटक सरकार अन्याय अत्याचार करीत असून सीमा प्रश्नाची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी यासाठी खानापूर तालुका युवा समितीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हजारो पत्रे पाठवली जाणार आहेत.
या माध्यमातून सीमावासियांच्या तीव्र भावना पंतप्रधानही पोहोचविल्या जाणार आहेत. त्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याची तळमळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
त्याचबरोबर लढ्याचा एक भाग म्हणून समितीच्या युवा कार्यकर्त्यांना सीमाप्रश्नाची माहिती व्हावी त्यांनी बांधीलकी जपावी यासाठी ज्येष्ठ बरोबरच युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पत्र पाठवण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस एल. आय. पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक आदींनी पत्रकाद्वारे केली आहे.
मध्यवर्ती समितीची बैठक-
आसाम मिझोराम सीमा तंट्याच्या पाश्वभूमीवर गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादा बाबत माहिती दिली होती त्या पाश्वभूमीवर बेळगाव सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकार सोबत पाठपुरावा करण्याबाबत आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी 3.30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे.सभासदांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.