आपल्याच शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना एक्स्टर्नल दाखवून स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यास नकार देण्याद्वारे त्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशात आडकाठी आणणाऱ्या वडगाव येथील एका खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राचार्याला मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी जाब विचारून चांगलेच धारेवर धरल्याची घटना आज सकाळी घडली. परिणामी आपल्या संस्थेतील गैरप्रकार उघड झाल्यामुळे हादरलेल्या प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचे मान्य केले आहे.
याबाबतची माहिती अशी की, पारिजात कॉलनी वडगाव येथील एका शिक्षण संस्थेमधील इयत्ता दहावी उत्तीर्ण 14 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यास संस्थेकडून ‘तुम्ही एक्सटर्नल आहात’ असे सांगून नकार दिला जात होता. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले होते. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी श्रीराम सेना हिंदुस्तानचे रमाकांत कोंडुस्कर व इतरांकडे याबाबतची तक्रार केली.
त्यावेळी उघड झालेल्या माहितीनुसार सदर शिक्षण संस्थेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग चालविले जातात. तथापि नववीमध्ये 80 -90 टक्क्यावर गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहावीच्या परीक्षेवेळी कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या गेल्या. त्यानंतर त्या कागदांवर दहावीच्या परीक्षेसाठी आम्ही आमच्या मुलाला एक्सटर्नल बसवत आहोत असे नमूद करून फसवणूक करताना संबंधित विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला अर्थात स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात नकार दिला जात होता. परिणामी संबंधित 14 विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशात मोठा अडथळा निर्माण झाला होता.
यासंदर्भात आज सकाळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर,शिवसेनेचे दत्ता जाधव, माजी नगरसेवक राजू बिर्जे, हभप शंकर बाबली महाराज, युवा कार्यकर्ते सागर पाटील व अमोल देसाई यांच्यासह श्रीराम सेना शिवसेना व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी पालक वर्गासमवेत जाऊन संबंधित शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना जाब विचारून चांगलेच धारेवर धरले.
स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्यामुळे सदर प्रकार गटशिक्षणाधिकाऱ्याच्या कानावर देखील घालण्यात आला. स्वतः रमाकांत कोंडुसकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
गटशिक्षणाधिकार्यांनी तात्काळ त्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना फोन करून त्यांची चांगलीच कानउघडणी केली. स्वतःच्याच शाळेतील विद्यार्थ्यांना एक्स्टर्नल दाखविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा जाब विचारून गटशिक्षणाधिकार्यांनी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका, अशी तंबी प्राचार्यांना दिली. अधिकाऱ्यांनी धारेवर धरल्यामुळे अखेर गयावया करत प्राचार्यांनी उद्या बुधवारी सकाळी संबंधित विद्यार्थ्यांना स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचे मान्य केले आहे. या पद्धतीने आपल्या मुलांना न्याय मिळवून दिल्याबद्दल पालकवर्ग श्रीराम सेना हिंदुस्तानसह शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीला दुवा देत आहेत