विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयु) बुधवारी एका जाहीर नोटीसद्वारे बेळगावातील एका तांत्रिक महाविद्यालयासह राज्यातील एकूण 6 तांत्रिक महाविद्यालयांशी असलेली संलग्नता मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्य संलग्न महाविद्यालयात पुनर्रप्रवेश दिला जाणार आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाशी संलग्न असणारी संबंधित 6 महाविद्यालयं बंद करण्याचा आदेश चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू असल्यामुळे संबंधित महाविद्यालयात 2021 -22 सालच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांना सतर्क करण्यासाठी विद्यापीठाने जाहीर नोटीस काढली आहे.
व्हीटीयुशी संबंधित बेळगाव शहरातील शेख कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेळगाव हे महाविद्यालय आर्थिक कारणास्तव बंद करण्यात येत आहे. बेळगावातील शेख कॉलेजसह अल्फा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, इस्लामिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बीटीएल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (सर्व बंगळूर), एकलव्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चामराजनगर आणि विनायक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केजीएफ ही महाविद्यालय बंद करण्यात आली आहेत.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे उपकुलगुरू करिसिद्धप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर सहा महाविद्यालयांपैकी तीन महाविद्यालयांनी तर अद्याप आपल्या सलग्नतेच्या नूतनीकरणासाठी अर्ज देखील केलेला नाही.
कांही महाविद्यालयांनी अर्ज केला आहे, मात्र त्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा आणि शिक्षक वर्ग यांची कमतरता आहे. या कारणास्तव संबंधित महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यात आली आहे.