महिला व बालकल्याण खात्यात केलेल्या पापाचे प्रायश्चित घेता यावे, पापाचे परिमार्जन करता यावे म्हणून शशिकला जोल्ले यांना धर्मादाय खाते देण्यात आले आहे, असे उपरोधात्मक वक्तव्य केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी आज केले.
बेळगाव येथील प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, महिला व बालकल्याण खात्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणाऱ्या शशिकला जोल्ले यांना त्यांच्या पापाचे परिमार्जन करता यावे यासाठी यावेळी धर्मादाय खाते देण्यात आले आहे. यावरून आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करतो हेच भारतीय जनता पक्षाने दाखवून दिले आहे. भाजपमधील सर्व जण मिळून भ्रष्टाचारात व्यस्त आहेत, असेही जारकीहोळी म्हणाले.
जोल्ले यांच्यावरील आरोपांची चौकशी झाली नाही. तथापि यासंदर्भात कोणी ना कोणी न्यायालयात जाणार आणि उशिरा का होईना न्यायालयाकडून चौकशीचा आदेश निघणार हे निश्चित आहे. शशिकला बाईंनी आणखी कांही घोळ घालू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुज्ञपणे त्यांच्याकडे धर्मादाय खाते सोपवून एक चांगली गोष्ट केली आहे, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी येत्या सोमवारी माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्या बैठकीत स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. तथापि राज्य केपीसीसीच्यावतीने पक्षाच्या चिन्हावर बेळगाव मनपा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. मागील वेळी बेळगाव महापालिकेत काँग्रेस उमेदवार प्रभावी होते. या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेस वरचढ राहील. येत्या निवडणुकीत काँग्रेस प्रभावी उमेदवार उभे करेल, असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.