बेळगाव जिल्ह्यातील लसीकरण वाढविण्याची गरज व्यक्त केली जात असताना खुद्द सिव्हिल हॉस्पिटलमध्येच लसीकरणाचा सावळागोंधळ सुरू असून त्याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. योग्य नियोजनाअभावी आज लसीकरणासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच झुंबड उडाली होती.
बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आज भल्या पहाटेपासून हॉस्पिटलसमोर रांगा लावण्यास सुरुवात केली होती. लसीकरणासाठी मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष जमा झाले होते. लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कांही काळाने लसीचा साठा संपत आला असल्याचे सांगण्यात आले.
परिणामी एकच झुंबड उडाली, आपल्याला प्रथम लस मिळावी यासाठी सर्वांमध्ये चढाओढ निर्माण झाल्यामुळे फेस मास्कसह सामाजिक अंतराच्या नियमाचा पार फज्जा उडाला होता. लसीकरणासाठी गर्दी इतकी वाढली की अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.
झुंबड करणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला. लसीकरणासाठी पहाटेपासून रांगेत उभ्या असलेल्या बऱ्याच नागरिकांना दुपारचे 4 वाजले तरी लसीचा डोस मिळाला नसल्यामुळे त्यांच्यात नाराजी व्यक्त होत होती.
लसीचा पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध नसेल तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तसे वेळीच उपस्थित लोकांना सांगणे गरजेचे होते. तथापि लसीचा नवा साठ आला की लसीकरण सुरू केले जाईल इतकेच सांगण्यात येत असल्यामुळे बिचारे बहुसंख्य नागरिक लस मिळेल या अपेक्षेने आज दिवसभर सिव्हील हॉस्पिटलसमोर तळ ठोकून होते.