बेळगाव ते अनमोड पर्यंतच्या महामार्गावरील सर्व गावे मराठी बहूभाषिक आहेत. त्यामुळे या महामार्गावर लावण्यात येणारे सर्व फलक इतर भाषेबरोबरच मराठी भाषेत लावण्यात यावेत अन्यथा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती स्वतःहून फलक लावण्यासाठी पुढाकार घेईल तसेच या महामार्गावर आंदोलन करण्याचा इशाराही युवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
खानापूर तालुका युवा समितीच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक एस.एम.नाईक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने ज्या भागात एखाद्या भाषेचे 15 टक्क्यांहून अधिक लोक रहात असतील तर त्यांना त्यांच्या भाषेतून माहिती देणे गरजेचे आहे अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत.
खानापूर व बेळगाव तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या 80 टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थीतीत महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव ते खानापूर व पुढील परिसरात सर्व फलक मराठी भाषेत लावावेत अन्यथा मराठी भाषिक स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा दिला.
खानापूर ते पिरणवाडी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकाणी फक्त कन्नड व इंग्रजी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत या भागातील लोकांना कन्नड भाषा समजत नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन तातडीने तिन्ही भाषेतील फलक लावावेत आणि मराठी भाषिकांना होणारी अडचण दूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी प्राधिकरणाचे व्यवस्थापक एस.एम.नाईक यांनी याबाबत वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देण्यात येईल असे आश्वासन युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदन देते वेळी सचिव सदानंद पाटील, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, मयूर बसरीकट्टी, मल्लाप्पा पाटील, ज्ञानेश्वर सनदी, भूपाल पाटिल, किशोर हेब्बाळकर, विशाल गौडवाडकर, राम मुतकेकर रोहन लंगरकांडे, राहूल पाटिल,सचिन पाटील,आदी उपस्थित होते