आगामी 2021 -22 सालच्या शैक्षणिक वर्षातील पदवीपूर्व महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले असून यासंदर्भात शिक्षण खात्यातर्फे कोरोना मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 2 टक्के असणाऱ्या जिल्ह्यातील पदवीपूर्व महाविद्यालयांचे वर्ग येत्या 23 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे 2 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांबाबत सरकार नंतर निर्णय घेणार आहे. प्रथम आणि द्वितीय वर्ष पीयूसीचे वर्ग एकाच वेळी सुरू केले जाणार आहेत. मात्र प्रत्येक वर्गातील शेकडा 50 टक्के विद्यार्थी आठवड्यातील पहिले तीन दिवस (सोमवार मंगळवार व बुधवार) वर्गात प्रत्यक्ष हजेरी लावतील, तर उर्वरित 50 टक्के विद्यार्थी घरामध्ये बसून ऑनलाइन पद्धतीने वर्गात हजेरी लावतील. त्यानंतर पुढील तीन दिवस म्हणजे गुरुवार शुक्रवार व शनिवार ऑनलाइन शिक्षण घेणारे 50 टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात हजेरी लावतील आणि पहिले तीन दिवस प्रत्यक्ष हजेरी लावणारे 50 टक्के विद्यार्थी घरामध्ये बसून वर्गात ऑनलाईन हजर असतील. या पद्धतीने पीयुसी प्रथम व द्वितीय वर्षाचे वर्ग सुरू केले जातील.
एखाद्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 100 पेक्षा कमी असेल आणि महाविद्यालयांमध्ये प्रशस्त मोठे वर्ग उपलब्ध असतील तर अशा ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गात हजेरी लावून कोरोनाचे नियमांचे पालन करण्याद्वारे शिक्षण घ्यावयाचे आहे. स्थानिक कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या वर्गातील हजेरीच्या सक्तीचा विचार केला जावा. वर्गखोल्यांचा विस्तार लक्षात घेऊन सामाजिक अंतराच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली जावी.
खबरदारीचा पहिला उपाय म्हणून राज्यातील सर्व पदवीपूर्व महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे सक्तीचे आहे. यासाठी राज्यातील शिक्षण खात्याच्या सर्व उपसंचालकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असेल याची काळजी घ्यावी.
विद्यार्थ्याकडून कोरोना संदर्भातील खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले जावे. महाविद्यालय आवारात गटागटाने फिरू नये. दोघांमध्ये किमान दोन हाताचे अंतर ठेवावे. फेसमास्कचा वापर सर्वांसाठी सक्तीचा असणार आहे. प्रत्येकाने वरचेवर हात धुण्याबरोबरच कोठेही थुकण्यावर बंदी असणार आहे.