बेळगाव महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी स्मार्ट सिटी योजनेचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे.
महापालिका निवडणूक काळात पालिका आयुक्त के. एच. जगदीश हे व्यक्तिगत कारणासाठी रजेवर गेले असल्यामुळे बागेवाडी यांची प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्ती केल्याचे जिल्हाधिकार्यांनी काल गुरुवारी सायंकाळी काढलेल्या आपल्या आदेशात नमूद केले आहे.
जगदीश हे रजेवर गेल्यानंतर बागेवाडी यांची प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तथापि त्यावेळी नगर विकास खात्याकडून तो आदेश बजावण्यात आला होता. यावेळी मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून बागेवाडी यांची नियुक्ती केली आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या कामासोबतच आता त्यांना महापालिकेचे कामकाज पहावे लागणार आहे.
आयुक्त के. एच. जगदीश हे गेल्या 26 जुलैपासून रजेवर गेले आहेत. तथापी नगर विकास खात्याने 6 ऑगस्ट रोजी बागेवाडी यांचा प्रभारी आयुक्त पदी नियुक्तीचा आदेश काढला होता. त्यानंतर 9 ऑगस्टपर्यंत यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार होता.
पुढे 10 ऑगस्ट पासून त्यांनी पदभार सोडल्यानंतर महापालिकेचे कामकाज आजतागायत आयुक्तांशिवाय सुरू आहे. प्रशासन उपायुक्त लक्ष्मी निप्पाणीकर यांनी पुढाकार घेऊन महापालिकेचे कामकाज सुरू ठेवले होते.