मी अमिताभ बच्चन बोलतोय, तुम्हाला केबीसीत २५ लाख रुपये लागलेत. दिलेल्या अकाउंट नंबरवर
१० हजार रुपये भरा आणि १० मिनिटांत २५ लाख रु. तुमच्या अकाउंटला जमा होतील असा फोन आल्यास सावधान ! फसू नका.
अमिताभ बच्चन च्या नावाखाली भलतेच लोक फसवू लागले आहेत. वेळीच शहाणे न झाल्यास नक्कीच मोठा फटका आपल्याला बसू शकतो.
होय, सर्वसामान्यांच्या फसवणुकीचा असा नवा फंडा बच्चन च्या नावाखाली काही बोलबच्चनांनी सुरु केला आहे. त्यामुळे असा फोन कॉल तुम्हाला आल्यास फसू नका, घाई-गडबडीने कुठल्याही अकाउंटला पैसे भरू नका. अन्यथा तुमची फसवणूक निश्चित होऊ शकते.
बेळगावचे रहिवासी मुकेश खानापुरे याना असाच अनुभव आला आहे, पण त्यांनी फसवणूक होऊ दिली नाही. त्यांना एक फोनकॉल आला. परंतु त्यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांची फसवणूक टळली आहे. कौन बनेगा करोडपती मधून अमिताभ बच्चन बोलतोय असे सांगून त्यांना कॉल आला होता.
तुम्ही 25 लाख रुपये बक्षिसाचे मानकरी ठरला आहात, लवकरात लवकर 10000 रुपये भरा असे त्यांना सांगण्यात आले होते. पण त्यांनी प्रकरण जागरूकपणे हाताळले असून आपली फसवणूक टाळली आहे.
कोन बनेगा करोडपती चा आणखी एक सिझन आता सुरू होत आहे. या निमित्ताने थेट ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे फोन ग्राहकांना येत आहेत. याच गोष्टीचा फायदा उचलून आपण स्वतः अमिताभ बच्चन बोलत असल्याचा आव आणून अनेक जण फसवणूक करत आहेत .मात्र कोन बनेगा करोडपती च्या माध्यमातून फोन आल्यास कोणत्या प्रकारची रक्कम भरावी लागत नाही.
याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी लागणार आहे. अन्यथा विनाकारण दुसऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करून कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येणार असून नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे.