बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी कन्नड बरोबरच मराठी आणि इंग्रजीमध्ये उमेदवारी अर्ज व अन्य कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी कन्नड भाषेतील उमेदवारी अर्ज देण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी भाषिक इच्छुक उमेदवारांची मोठी गैरसोय होत असून त्यांच्यासाठी कन्नडमध्ये हा अर्ज भरणे त्रासदायक ठरत आहे. यासाठी प्रशासनाकडून कन्नडसह इंग्रजी व मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज मिळावेत म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळाने आज देखील जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. याप्रसंगी अध्यक्ष दळवी यांच्यासमवेत कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी व महेश जुवेकर उपस्थित होते.
भारतीय निवडणूक आयोगाने कोणकोणत्या प्रदेशात अल्पसंख्यांकांसाठी त्यांच्या भाषेत सरकारी कागदपत्रे द्यावी त्याची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये कोणकोणत्या मतदार संघात कोणत्या भाषेची कागदपत्रे द्यावीत याची देखील माहिती आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या सदर आदेश वजा माहिती पत्रकामध्ये बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघामध्ये मराठी व कन्नड भाषेमध्ये मतदार यादीसह उमेदवारी अर्ज वगैरे अन्य कागदपत्रे दिली जावीत, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. निवेदनासह निवडणूक आयोगाची यादी देखील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. भाषिक अल्पसंख्यांकांचे अधिकाराचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असते मात्र दुर्दैवाने बेळगावात त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी अनेक वेळा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह आमची चर्चा झाली आहे.
त्यावेळी त्यांनी जी कार्यवाही केली आहे त्याचे अवलोकन करावे. त्याचप्रमाणे तात्काळ अल्पसंख्यांक तक्रार निवारण समितीची स्थापना करून त्या समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जावा, असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर मराठी भाषेत उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती मालोजीराव अष्टेकर यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना दिली.