बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराने कोणत्याही वाहनाचा वापर करू नये. तसेच घोळक्याने प्रचार न करता उमेदवारांसह फक्त 5 जणांनी घरोघरी प्रचार करावा, असा आदेश निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी काढला आहे.
प्रचारासाठी वाहनाचा वापर करू नये. फेसमास्क, सेनिटायझर आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरात स्वरूपात प्रचार करता येऊ शकतो. मात्र त्याचा खर्च दाखवावा लागेल, अशा सूचना दुडगुंटी यांनी केल्या आहेत. येता सोमवार 23 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्याचप्रमाणे 26 ऑगस्ट ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून प्रचाराला जोम येणार आहे.
दरम्यान, काल गुरुवारपर्यंत पाच प्रभागांत करिता 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून प्रभाग क्रमांक 13 हा सामान्य महिलांकरिता राखीव असल्याने गुरुवारी तीन अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित चार अर्ज प्रभाग क्रमांक 18, 19, 25 आणि 46 मध्ये दाखल झाले आहेत. बुधवारी दोन प्रभागांकरता प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता.
त्यानंतर गुरुवारी पाच प्रभागांकरता 7 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्र. 13 मधून रविता राहुल रेडेकर, मीनाक्षी संजय चिगरे आणि स्वाती चारुदत्त केरकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्र. 18 मधून शिवा लिंबाजी चौगुले, प्रभाग क्र. 19 मधून विवेक शामराव बस्की, प्रभाग क्र. 25 मधून माजी नगरसेविका सरला शिवानंद हेरेकर आणि प्रभाग क्र. 46 मधून शिवानंद मल्लाप्पा मुगळीहाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.