बेळगाव महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असली तरी महापालिकेकडून नेहमीप्रमाणे मतदार यादीत सावळागोंधळ घालण्यात आला आहे. मतदार यादीत बऱ्याच मतदारांची नांवे गायब असल्याच्या तक्रारी वाढल्या असून नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 58 प्रभागांमधील मतदारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तथापि या मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ घालण्यात आला आहे. मतदार यादीमध्ये कांही प्रभागांमधील नागरिकांची नांवे गायब आहेत तर कांही प्रभागांच्या मतदार यादीमध्ये शेजारील प्रभागातील नागरिकांची नांवे घुसडण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्र. 7 मधील गोंधळी गल्ली येथील कांही नागरिकांची नांवे मतदार यादीतून गायब आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या यादीमध्ये मेणसे गल्ली, भातकांडे गल्ली आदी ठिकाणच्या नागरिकांची नांवे छापण्यात आली आहेत. हा प्रकार अन्य कांही प्रभागांमध्ये देखील घडला असल्याचे समजते. या प्रकारामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
मतदार यादीतून नांवेच गायब असल्यामुळे संबंधित नागरिकांनी निवडणुकीचे मतदान कसे करायचे? असा संतप्त सवाल केला जात आहे. तसेच या पद्धतीने मतदार यादीतून नांवे गाळून नागरिकांचा घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार बेळगाव महापालिका हिरावून घेत असल्याचा आरोपही केला जात आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पुरवणी मतदार यादी तयार करावी आणि झालेल्या चुका दुरुस्त करण्याबरोबरच नांवे गायब असलेल्या नागरिकांची नांवे त्यांच्या -त्यांच्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट केली जावीत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.