Monday, April 29, 2024

/

मनपा निवडणूक हा आमच्या लढ्याचाच भाग: दीपक दळवी

 belgaum

मराठीचे वर्चस्व दाखवून देणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून सीमाप्रश्नाच्या लढाईत बळकटी देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मनपा निवडणूक हा आमच्या लढ्याचाच भाग आहे यासाठी कटिबद्ध राहूया असे आवाहन करतानाच प्रत्येक वॉर्डात एकच उमेदवार देऊन सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे सक्षमतेने या निवडणुकीला सामोरे जाऊया. सीमाप्रश्नाचा लढा टिकवून ठेवण्यासाठी बेळगाव महापालिकेवर भगव्याचे अस्तित्व अबाधित राखुया, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.

बेळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने मंगळवारी दुपारी बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन दीपक दळवी बोलत होते. मराठा मंदिरच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला व्यासपीठावर कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रणजीत चव्हाण -पाटील आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत आपण एकमेकांच्या विरोधात लढू नये. यासाठी काय करावे लागेल हे कार्यकर्त्यांनी व मराठी भाषिकांनी आम्हाला सुचवावे. समिती आपली मते तुमच्यासमोर मांडेल. सर्वांनी आपली मते मांडावीत. उमेदवार निवडताना जे समितीच्या ध्येयासाठी लढले आहेत अशा गल्लीतील अनुभवी ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला जात आहे.यामार्गातून प्रत्येक वॉर्डात एक उमेदवार उभा करून त्याला जास्तीतजास्त मतांनी निवडणून आणण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सध्याच्या बदललेल्या मतदार यादीनुसार प्रभाग विभागण्यात आले आहेत. काही प्रभागातील लोकांनी संघटित निर्णय घेऊन आमचा उमेदवार आम्ही ठरवतो, असे सांगितले आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही यावेळी एकच उमेदवार उभा करू त्याला समितीने पाठिंबा द्यावा, असे स्वतः नागरिकांनी स्पष्ट केले आहे. ही अत्यंत सुखकारक घटना असून त्याचे अनुकरण इतर प्रभागात केले जावे असे आवाहन करताना त्यासाठी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे दीपक दळवी यांनी सांगितले.

दिवस फार कमी आहेत तेंव्हा सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जाऊया. सध्या सोशल मीडियाचे माध्यम प्रभावी बनले आहे. त्याचा उपयोग करून घेतला जावा. प्रत्येक प्रभागाची आपली अशी समिती असावी त्यांनी आपल्याकडील इच्छुकांशी चर्चा करून एक उमेदवार समितीकडे पाठवावा. समिती त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपल्या ताकदीनुसार कार्य करेल. कोणताही दुजाभाव केला जाणार नाही, असेही दळवी यांनी स्पष्ट केले.

 belgaum

यावेळी बोलताना मनोहर किणेकर म्हणाले स्थानिक पंच कमिटी, महिला मंडळ युवक मंडळ सेन्स घेऊन उमेदवार ठरवू- आगामी 20 ऑगस्ट पर्यंत उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.

या पूर्वी निवडून आलेले पुन्हा इच्छुक असतील तर त्यांना समंजसपणे सांगण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. एकीमुळे संघटना वाढणार आहे. तेंव्हा मनावर दगड ठेवून संबंधित इच्छुकांनी आपल्या आकांक्षांना बंधने घालून प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार उभा राहील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शेवटी दीपक दळवी यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांनी निवडणुकीसंदर्भात आपापली मते मांडली. बैठकीस इच्छुक उमेदवारांसह त्यांचे समर्थक समितीचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.