सीमाप्रश्नाची चळवळ 1956 पासून अविरतपणे सुरू आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने केंद्राचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सीमावासीय जनता करत आली आहे. मोर्चे, आंदोलने,धरणे, सत्याग्रह,उपोषण, मेळावे, महामेळावे आणि निवडणूक हे सर्व मार्ग सीमावासीयांनी यापूर्वी अवलंबले असून आता सह्यांची मोहीम गतिमान करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेऊन सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार सीमावासीय जनतेने व्यक्त केला आहे.
खानापूर युवा समितीने सर्वप्रथम हा प्रस्ताव मांडला. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने पत्रांची मोहीम राबविण्याचे आवाहन करण्यात आले. याला जनतेने चांगलाच पाठिंबा दिला आहे. खानापुरातून बेळगावातून हजारो पत्रे पाठविली जात आहेत.
पहिल्या टप्प्यात बिदर मधून सिमप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीनशे पत्र रवाना करण्यात आली आहे. मध्यवर्ती म ए समितीचे सदस्य व बिदर म ए समितीचे अध्यक्ष रामराव राठोड यांनी याकामी नेतृत्व केले आहे.याच बरोबरीने समितीच्या सर्व शाखा आणि युवा कार्यकर्ते पत्रे पाठविण्याच्या जोरदार तयारीत आहेत.
हॅशटॅग येणार चर्चेत
उद्या अर्थात 9 ऑगस्ट रोजी #pmsolvetheborderissue हा हॅशटॅग घालून हजारो ट्विट करण्याचा निर्धारही सीमावासीयांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी काळा दिनाच्या निमित्ताने याप्रकारे ट्विट करून संपूर्ण जगाचे लक्ष सीमाप्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
यावेळी होणाऱ्या या आंदोलनामुळे वेगळ्या माध्यमातून सीमाप्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.