बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारांसाठी आजचा शेवटचा दिवस म्हणजे जणू ‘बॉक्सिंग डे’ असल्यामुळे आज दिवसाखेर 150 हून अधिक अर्ज दाखल झाल्याचा अंदाज आहे.
महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मागील सोमवार 16 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या शुक्रवारी मोहरम असल्याने सर्व कार्यालय बंद होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. शनिवारी शहराच्या विविध प्रभागातून 76 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र आजचा सोमवार 23 ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उमेदवारांसाठी ‘बॉक्सिंग डे’ ठरला.
उमेदवारांना आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावयाचे होते. त्यामुळे सकाळपासूनच महापालिका मुख्य कार्यालय, कोनवाळ गल्ली कार्यालय, गोवावेस कार्यालय आणि अशोकनगर कार्यालय येथील उमेदवारी अर्ज भरणा केंद्राच्या ठिकाणी उमेदवारासह त्यांच्या सूचक व समर्थकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शहरातील प्रत्येक उमेदवारी अर्ज भरणा केंद्रासमोर अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेली एकंदर गर्दी पाहता आज एका दिवसात जवळपास 150 अर्ज दाखल झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट असून त्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.