वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधील सोन्याच्या दागिन्यासह एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज भामट्यांनी लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी शहरातील शनिमंदिरानजीक घडली.
शहरातील पाटील गल्ली शनी मंदिराजवळ वाहतूक कोंडीसह निर्माण होणारी गर्दी पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ताशिलदार गल्ली येथील एका महिलेच्या पर्समधील साडेतीन तोळ्याचे गंठण, एटीएम कार्ड व रोख 500 रुपये असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज भामट्यांनी शिताफीने लंपास केला.
कांही वेळानंतर पर्समधील ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच त्या महिलेला धक्काच बसला.
याप्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. खडेबाजार पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून भामट्यांचा शोध घेत आहेत.