राज्यातील अभ्यासू आणि कर्तबगार विधान परिषद सदस्य बेळगावचे आमदार महांतेश कवटगीमठ यांची दुसऱ्यांदा कर्नाटक विधान परिषदेच्या मुख्य प्रतोद पदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
विधान परिषद मुख्य प्रतोद पदी निवड झाल्यानंतर आमदार कवटगीमठ यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केल्यानंतर कवटगीमठ यांनी आपल्या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर कर्नाटकातील अभ्यासू व उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य असलेले मुरब्बी राजकीय नेते म्हणून महांतेश कवटगीमठ यांचा नांवलौकिक आहे. सहकार, शिक्षण, सामाजिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रात त्यांची वेगळी छाप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
विरोधी पक्षात असताना त्यांनी जिल्ह्यातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रलंबित प्रकल्प व योजना मार्गी लावण्यासाठी सरकारला धारेवर धरले आहे. गेल्या 2019 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर पक्षाने सरकारचे मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
आता राज्यातील सरकारचे खांदेपालट झाल्यानंतर आमदार कवटगीमठ यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी होत होती. तथापि मुख्यमंत्री बोम्मई यांच्या सरकारने त्यांना विधान परिषदेच्या मुख्य प्रतोद पदीच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा अधिकृत आदेश बुधवारी विधान परिषदेतील सरकारच्या सचिव के. आर. महालक्ष्मी यांनी काढला आहे. आपल्या फेर नियुक्तीबद्दल आमदार महांतेश कवटगीमठ यांनी काल गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.