बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी मराठी भाषिकांकडून प्रत्येक प्रभागातून एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू असून त्याची नांदी कणबर्गी येथे झाली आहे.
माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या प्रयत्नांमुळे कणबर्गी गावाने एकीची वज्रमूठ आवळली असून एकच मराठी भाषिक उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
कणबर्गी गावामध्ये महापालिकेचे दोन प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये सुमारे 22 वर्षांपूर्वी माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या स्वरूपात शेवटचे मराठी भाषिक नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर इतर भाषिक उमेदवार या ठिकाणी निवडून आले होते. मात्र आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी या प्रभागामधून सर्वानुमते प्रत्येकी एक मराठी भाषिक उमेदवार उभा करण्याचा आणि त्याला बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
यासाठी माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी नगरसेवक संजय सुंठकर एकत्र आले असून कणबर्गी येथे नुकत्याच झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीमध्ये एकच मराठी भाषिक उमेदवार उभा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
शिवाजी सुंठकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीप्रसंगी माजी नगरसेवक संजय सुंठकर, प्रकाश मुचंडीकर, सिद्राई नाईक, गणपत बनोशी, जयराम मुतगेकर, प्रशांत शहापूरकर, ॲड. शिवाजी पाटील, हिरामणी मुचंडीकर, समर्थ बुरटे, परशराम सुंठकर, किसन सुंठकर, बबन मालाई, गजानन बिर्जे आदींसह गावकरी उपस्थित होते.