अवैज्ञानिकपणे कोरोनाचे नांव पुढे करून सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार आहे. त्यांनी सर्वप्रथम हा आदेश मागे घ्यावा, असे श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी स्पष्ट केले.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचा राज्यभरात निषेध केला जात आहे. हे निर्बंध मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही मुतालिक यांनी दिला.
सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत हे करताना बेळगावसह कलबुर्गी आणि हुबळी-धारवाड महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुका, भाजपची नियोजित जनाशीर्वाद यात्रा, राजकीय कार्यक्रम यांना कोरोनाचे नियम लागू नाहीत का? मोहरमला परवानगी दिली जाते, मग हिंदूंचे सण आणि यात्रांवरच सरकारचे निर्बंध कशासाठी? असे संतप्त सवालही त्यांनी केले.
सर्व व्यवहार खुले असताना कोरोनाची भीती दाखवून निर्बंध घालणे योग्य नाही, असे देसाई म्हणाले. श्री गणेशोत्सवावरच का निर्बंध घातले आहेत? खरे तर गणेशोत्सवाला मोठा सार्वजनिक इतिहास आणि परंपरा आहे. या उत्सवावर निर्बंध घातणे म्हणजे लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्यामुळे तो निषेधार्ह आहे. कोरोना असतानाही शाळा-कॉलेज, माॅल, दारू दुकाने, बार वगैरे सर्व खुले करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव कोरोनाचे शंभर नियम लावा आम्ही ते पाळू, श्रीची आरती मात्र सार्वजनिकरित्याच केली जाईल. गणेशोत्सव निर्बंध घालणे म्हणजे हिंदुत्वाच्या आधाराला बाधा पोहोचवणे आहे, असेही प्रमोद मुतालिक म्हणाले.