Wednesday, January 8, 2025

/

कोरोना निर्बंधामुळे प्रचारासाठी सर्वांचा सोशल मीडियावर भर

 belgaum

बेळगाव महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार अंतिम टप्प्यात आला असून कोरोना निर्बंधामुळे प्रचार सभा, कार्यकर्त्यांची गर्दी असे कांहीही यावेळी पहावयास मिळालेले नाही.

उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठीवर भर देण्याबरोबरच प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात आधार घेतल्याचे पहावयास मिळत आहे. व्हाट्सअप इंस्टाग्राम ट्विटरवर वॉलपेपर ऑडिओ व्हिडिओ आदींच्या माध्यमातून प्रत्येक जण आपली प्रतिमा मतदारांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बेळगाव महापालिका निवडणूक रिंगणात 385 उमेदवार असून सर्वांनीच प्रचारासाठी कंबर कसली आहे. कोरोनाची धास्ती आणि वीकेंड कर्फ्यु अशा दोन्ही अडचणींवर मात करून उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रचाराची कसरत करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी उमेदवारांना केवळ सात दिवसांचा कालावधी मिळाला होता. कोरोना मार्गदर्शक सूचीच्या निर्बंधांमुळे या कालावधीत प्रचारासाठी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत कांही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या दुसर्‍या दिवशीपासून मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला होता. यावेळी बऱ्याच उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला असून विविध प्रकारच्या क्लुप्त्या प्रचारासाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.Kapeel

यंदा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आम आदमी आदी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची भर पडली असल्याने अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी ज्यादा मेहनत घ्यावी लागत आहे. राष्ट्रीय पक्षांची आश्वासने आणि आमिषाला सर्वसामान्य मतदार बळी पडतील अशी भीती असल्याने प्रभागातील समस्या महत्त्वाच्या असल्याची आठवण सर्वसामान्य नागरिक अपक्ष उमेदवारांना करून देत आहेत. तसेच भूलथापांना बळी न पडता मतदान करा, असे आवाहन आवर्जून केले जात आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रथमच बेळगावात राष्ट्रीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी पहावयास मिळाली. कॉंग्रेसतर्फे बेळगावात केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्यासह आमदार आणि माजी खासदारांनी आयोजित निवडणूक सभा समारंभ आणि कार्यक्रमात भाग घेतला. त्याचप्रमाणे भाजपतर्फे जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगल अंगडी, खासदार इराण्णा कडाडी यांच्यासह आमदारांनी बैठका, सभा आणि पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. यातून उभय पक्षांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने पक्षाच्या चिन्हावर 57 प्रभागांमध्ये पहिल्यांदाच आपले उमेदवार उतरवले असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. परिणामी भाजप सगळी शक्ती पणाला लावत आहे. यासाठी प्रामुख्याने आयटी सेलचा म्हणजे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केली आहेत. काँग्रेसकडून घरफाळा, वाणिज्य करात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करून मतदारांना राजकीय भेट देण्याचे जाहीर केले आहे, तर भाजपने अनेक योजना जाहीर करून मृत्यूनंतर मोफत अंत्यसंस्काराच्या आश्वासनासह विकासाचा आराखडा त्यांनी जनतेपुढे मांडला आहे.

बेळगाव महापालिकेच्या मागील सभागृहात भाजपचे 5 ते 6 नगरसेवक होते. मात्र आता 45 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा दावा भाजपने केला असला तरी प्रत्यक्षात तितके यश त्यांना मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेणाऱ्या भाजपने प्रामुख्याने मराठी मते कशी विभागली जातील यावर भर दिला आहे. यासाठी त्यांचे जिल्हास्तरीय कानडी नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसला उमेदवारच मिळालेले नाहीत. त्यांनी जवळपास 49 प्रभागांमध्ये आपले उमेदवार दिले असले तरी बहुतांश उमेदवार हे उर्दू अथवा कन्नड भाषिक आहेत. मात्र होटबँक जिथे आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रचारावर जोर दिला आहे. तथापि भाजप प्रमाणे काँग्रेसने मात्र महापालिका ताब्यात घेण्याचा कधीच दावा केलेला नाही. त्यांची प्रारंभापासूनच उर्दु भाषिकांवर भिस्त आहे. त्यामुळे किमान 15 नगरसेवक निवडून येतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Logo social media
Logo social media

सर्व राजकीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे कडवे आव्हान असणार आहे. सीमा प्रश्नाची सोडवणूक, महापालिकेवर पुन्हा भगवा ध्वज फडकवणे, मराठी अस्मिता आणि संस्कृतीचे जतन यासाठी समितीने पुन्हा एकदा महापालिकेवर वर्चस्व मिळवण्याचा निर्धार केला आहे. बहुतांश प्रभागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे पारडे जड असले तरी फाटाफुटी, फंदफितुरीला कोणत्याही परिस्थितीत थारा मिळणार नाही याची डोळ्यात तेल घालून खबरदारी घ्यावी लागणार आहे.

आम आदमी, एमआयएम, एसडीपीआय हे नवे पक्षदेखील यावेळी महापालिका निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आम आदमी पक्षाने देखील निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. एमआयएमचे कांही मोजकेच उमेदवार असले तरी त्यांच्या प्रचारासाठी खुद्द एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी प्रचारासाठी बेळगावला येऊन गेले आहेत. दरम्यान, आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असून उद्या बुधवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 7 पासून जाहीर प्रचार करता येणार नाही. प्रचार करताना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.