यावेळी राज्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गाणेग समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे गाणेग समाजाला तात्काळ मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा गाणेग समाज अध्यक्ष रामप्पा इटगी यांनी केली आहे.
शहरातील एका हॉटेलमध्ये आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पूर्वीच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात लक्ष्मण सवदी यांना मंत्रीपद देण्याबरोबरच उपमुख्यमंत्री पद देण्यात आले होते. मात्र यावेळी त्यांना डावलण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यात गाणेग समाजाचे सुमारे 2 ते 3 लाख लोक आहेत. त्याचप्रमाणे राज्यात त्यांची संख्या सुमारे 60 लाख आहे. तथापि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नूतन मंत्रिमंडळात आमच्या समाजावर अन्याय झाला आहे. तेव्हा ही चूक सुधारताना गाणेग समाजाला मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान दिले जावे, असे इटगी म्हणाले.
कर्नाटक राज्यातील 9 ते 10 लोकसभा सदस्य निवडून आणण्यात आमच्या समाजाचा मोठा वाटा आहे. राज्यात 40 ते 50 विधानसभा सदस्यांना देखील प्रामुख्याने आमच्या समाजाने विजय केले आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला आमच्या समाजाने नेहमीच पाठिंबा देऊन पक्षाच्या विकासासाठी परिश्रम घेतले आहेत. राज्यातील पोटनिवडणुकीत अथणी, कागवाड आणि बसवकल्याण या तीन मतदारसंघात लक्ष्मण सवदी यांना विजयी करण्यात गाणेग समाजाचा सिंहाचा वाटा आहे असे सांगून गाणेग समाजासाठी लवकरात लवकर निगम स्थापन केले जावे. तसेच बागलकोटचे लोकसभा सदस्य व्ही. सी. गद्दीगौडर यांना केंद्रीय मंत्री केले जावे, अशी मागणीही रामप्पा इटगी यांनी केली.
पत्रकार परिषदेस बसवराज कोण्णन्नावर, कुबेरप्पा सोरटूर, शंकर हालगी, सिद्राई गाणगी, शोभा गाणगेर, बसवराज मड्डीमनी, प्रकाश कादरगी, शिवशंकर मड्डीमनी, महांतेश गाणगेर, नागेश तेली, महादेव सिद्दनावर तिपन्ना गाणगेर, राजीव गाणगी आदी उपस्थित होते.