कोणतीही पूर्वसूचना न मिळता बेळगाव महापालिका निवडणूक अचानक जाहीर झाल्यामुळे इच्छुकांना तयारीसाठी कमी वेळ आहे. परिणामी रिंगणात उडी घेणाऱ्या इच्छुकांनी आत्तापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार सुरू केला आहे.
सध्या शहरात गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा? याबाबत चर्चा बैठका होत असताना महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले असून इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची एकच धांदल उडाली आहे. काल सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या युवा मतदार सोशल मीडियावर अधिक सक्रिय असल्याने इच्छुकांनी देखील त्याद्वारे प्रचार करण्यावर भर दिला आहे. सोशल मीडियावर भावी नगरसेवक -नगरसेविका होऊ इच्छिणाऱ्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा यांचा प्रयत्न आहे. निवडणुकीत कोरोना संबंधित नियमांचे पालन करावे लागणार आहे. यामुळे साहजिकच आपल्या प्रभागात मोठे बॅनर लावणे, भित्तीपत्रके चिकटविणे, रिक्षातून स्पीकरद्वारे जोरदार प्रचार करण्यासह जाहीर सभा घेणे, रॅली काढणे आदी प्रकारांवर निर्बंध येण्याची शक्यता अधिक आहे.
जाहीर प्रचारवरही मर्यादा येणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बहुतांश इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. अनेकांनी उमेदवारी अर्ज भरण्या आधीपासूनच सोशल मीडियाद्वारे प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकंदर सोशल मीडियात सध्या प्रचाराचे प्रभावी माध्यम बनल्याने याकडे सर्वांचाच ओढा वाढला आहे.