कर्नाटक राज्याच्या नगरविकास मंत्र्यांनी मास्टर प्लॅन व कणबर्गी निवासी योजनेचा मुद्दा गांभीर्याने घेतल्यामुळे बेळगाव शहराचा मास्टर प्लॅन (सीडीपी) येत्या सप्टेंबर 2021 अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तयार झालाच पाहिजे. त्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी सक्त सूचना बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी ईजीआयएस कंपनीच्या प्रतिनिधींना दिली आहे.
बेंगलोर येथे अलीकडेच झालेल्या बैठकीत राज्याचे नगरविकास मंत्री बैराती बसवराज यांनी बेळगाव मास्टर प्लॅन व कणबर्गी निवासी योजनेचा मुद्दा गांभीर्याने घेतला होता. यासंदर्भात बुडा आयुक्तांना धारेवर धरले होते. नगर विकास मंत्र्यांनी मास्टर प्लॅनचे काम पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर अखेरची डेडलाईन दिली आहे. त्यामुळेच आयुक्त नसलापूर यांनी नुकतीच बैठक घेऊन ही ईजीआयएस कंपनीला 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.
सदर बैठकीत मास्टर प्लॅनचे काम सध्या कुठपर्यंत आले आहे याचा आढावा घेऊन त्यांनी सध्या कोणते काम सुरू आहे? व यापुढे कोणते काम करायला हवे? याची माहिती घेतली. त्या कामात कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये असा इशाराही नसलापूर यांनी दिला. शहराचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम ईजीआयएस कंपनीने सप्टेंबर 2020 मध्ये सुरू केले आहे. हे काम 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असतानाही ते पूर्ण झालेले नाही. कंपनीचे चार प्रतिनिधी सध्या बेळगावात कार्यरत आहेत. कोरोना संकटामुळे मास्टर प्लॅनचे काम वेळेत पूर्ण करता आले नसल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिली.
यावेळी त्यांनी दिलेल्या कामाच्या सविस्तर माहितीमध्ये कांही कामांमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. रस्त्याची रुंदी नमूद करताना झालेल्या चुकांची तातडीने दुरुस्त करण्याची सूचना नसरापूर यांनी दिली. त्याचप्रमाणे भविष्यात मास्टर प्लॅनचे काम करताना कोणती खबरदारी घ्यायला हवी याबाबतही मार्गदर्शन केले. बेळगावच्या सध्याच्या मास्टरप्लॅनची मुदत संपली आहे. तत्पूर्वीच नवा मास्टरप्लॅन तयार होणे आवश्यक होते. तथापि आता सव्वा महिना शिल्लक आहे. त्यामुळे कंपनीने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी सूचनाही आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी दिली.