राज्याच्या नव्या मंत्रिमंडळातील जे मंत्री त्यांना मिळालेली खाती योग्य नाहीत अशी जाहीर वाच्यता करून गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन करत आहेत अशा बेजबाबदार मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मूडलगीचे आरटीआय कार्यकर्ता भीमप्पा गडाद यांनी केली असून तशा आशयाची पत्रे त्यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना धाडली आहेत.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ नुकताच पार पडला असून सर्व मंत्री शपथबद्ध झाले आहेत. तथापि कांही मंत्री त्यांना मिळालेल्या खात्याबाबत नाराज असून ते त्याची जाहीर वाच्यता करत आहे. या पद्धतीने त्यांनी घेतलेल्या गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन होत असून हा घटनेचा अवमान आहे, असे भीमप्पा गडाद यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘मी या राज्याचा मंत्री या नात्याने मला दिलेल्या खात्याच्या कामकाजाबाबत गोपनीयता पळून राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध आहे’, अशी शपथ घेतलेले कांही मंत्री शपथ मोडून आपल्याला मिळालेले खाते चव्हाट्यावर आणत आहेत.
राज्यातील सर्व सरकारी खाती राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या घटनेनुसार तयार केलेली असतात. प्रत्येक मंत्र्यांनी ही खाती जबाबदारीने चालवावी लागतात, ही वस्तुस्थिती असताना संबंधित मंत्री त्यांना मिळालेली खाती योग्य नाहीत असे सांगून घटनेचा अवमान करत आहे.
राज्य मंत्रिमंडळातील उदाहरणादाखल नांवे द्यायची झाल्यास एमटीव्ही नागराज, श्रीरामलू, आनंदसिंग, शशिकला जोल्ले आदी मंत्री आपल्याला मिळालेले खाती योग्य नसल्याचे सांगून देशाच्या घटनेचाच नव्हे तर राज्यातील संपूर्ण जनतेचा अपमान करत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. तेंव्हा अशा बेजबाबदार मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करून घटनेचे व कायद्याचे रक्षण करावे, अशी मागणी मी राज्यपाल आणि मुख्यमंत्री बसवराज
बोम्मई यांच्याकडे करत आहे.
तशा आशयाची पत्रे देखील मी आज त्यांना पाठवत आहे. माझ्या पत्राची दखल घेऊन कार्यवाही केली नाही तर भविष्यात कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा मी दिला आहे, असेही आरटीआय कार्यकर्ता भिमाप्पा गडाद यांनी स्पष्ट केले.