शांती आणि प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई येथील असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स या संघटनेतर्फे बेळगावच्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन या संस्थेला ‘सोशल एक्सलन्सी -2021’ हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
समाजाची उन्नती आणि देशी उभारणीस हातभार लावत असल्याबद्दल सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन या संस्थेला ‘सोशल एक्सलन्सी -2021’ हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत असल्याचे असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स या संस्थेने स्पष्ट केले आहे.
गेल्या स्वातंत्र्यदिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर हे आहेत. सदर सेवाभावी फाउंडेशन बेळगाव शहर, बेळगाव तालुका खानापूर तालुका आदी भागात सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते.
या फाउंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी, फुड फाॅर मेडी आणि एज्युकेशन फाॅर नीडी या संघटनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा, अन्नदान, शैक्षणिक सहाय्य, अंत्यसंस्कारासाठी मदत, श्रमदानाने स्वच्छता आदींसह सामाजिक बांधिलकीतून अन्य विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असतात.
आपत्तीजनक कोरोना प्रादुर्भाव काळातदेखील या संघटना समाज सेवेत अग्रभागी राहिल्या आहेत. या सर्व कार्यांची दखल घेऊन मुंबईच्या असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स या संघटनेतर्फे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनला राष्ट्रीय प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले आहे.