Thursday, January 9, 2025

/

सर्व कागदपत्रे मराठीत उपलब्ध करा : निवडणूक आयुक्तांकडे मागणी

 belgaum

बेळगाव महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासह संबंधित अन्य कागदपत्रे -परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याद्वारे आम्हा मराठी भाषिक अल्पसंख्यांक लोकांचे हितरक्षण करावे, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे राज्य निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन बेळगावात आलेले राज्य निवडणूक आयुक्त डॉ. बी. बसवराजू यांना सादर करण्यात आले.

निवेदनाचा स्वीकार करून आयुक्तांनी आवश्यक माहिती घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिका निवडणुकीची घोषणा केली असून 16 ऑगस्टपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वितरण केले जात आहे. मात्र हे उमेदवारी अर्ज फक्त कन्नड भाषेतच छापलेले आहेत. हे अर्ज मराठी भाषिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. आम्ही बेळगाव जिल्ह्यात भाषिक अल्पसंख्यांक असून देखील संबंधित खाते आम्हाला इंग्रजी अथवा मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यास नकार देत आहे. सरकारने गेल्या 31 मार्च 2004 मध्ये काढलेल्या आदेशानुसार ज्या प्रदेशात भाषिक अल्पसंख्यांक 15 टक्के किंवा त्याहून अधिक आहेत अशा ठिकाणी महत्वाचे सरकारी आदेश, परिपत्रके स्थानिक भाषिक अल्पसंख्यांकांच्या भाषेत भाषांतरित करून दिली जावीत, असा आदेश आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यामध्ये मराठी भाषिकांची संख्या 15 टक्क्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथील मराठी भाषिकांना उमेदवारी अर्जासह सर्व सरकारी कागदपत्रे मराठीत मिळाली पाहिजेत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने देखील बेळगावात आवश्यक सरकारी कागदपत्रे, बिले, आदेश वगैरे मराठीतून द्यावेत अशी सूचना राज्य सरकारला केली आहे.

भाषेच्या अडथळ्यामुळे सध्याच्या महापालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान मराठी भाषिकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उदाहरणार्थ भांदूर गल्ली वार्ड क्र. 9 आणि टिळकवाडी वार्ड क्र. 44 येथील मतदार यादीत मतदारांचे नांव आणि फोटो भिन्न छापण्यात आले आहेत. अनेक नांवे गाळली आहेत किंवा चुकीची छापले आहेत. काहींमध्ये मतदारांचे फोटो वेगळे आहेत. एका बुथसाठी दोन मतदार याद्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका यादीत फक्त फोटो, तर दुसर्‍या यादीत फक्त नांवे आहेत.

या गलथानपणामुळे सामान्य मतदार आणि उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे उमेदवाराच्या मागणीनुसार त्याच्या भाषेत दिली जावीत. एकंदर बेळगाव महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासह संबंधित अन्य कागदपत्रे -परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत आणि अल्पसंख्यांक मराठी भाषिकांच्या घटनात्मक आणि वैधानिक अधिकाराची सुरक्षा करण्याद्वारे त्यांचे हितरक्षण करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त डॉ. बी. बसवराजू यांना निवेदन सादर करतेवेळी दीपक दळवी व मनोहर किणेकर यांच्यासमवेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आणि जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.