शेजारील राज्यात कोरोना चा कहर झाल्यामुळे कर्नाटक सरकारने राज्याच्या सीमेवर कोरोना मार्गदर्शक सूचीची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. या संदर्भात एडीजीपी उमेश कुमार यांनी आज निपाणी -कोगनोळी सीमेवरील चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली.
कोगनोळी चेकपोस्ट येथील पाहणीप्रसंगी एडीजीपींसमवेत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी जिल्हा पंचायत सीईओ दर्शन आदी अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात बैठक पार पडली. जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालय येथे एडीजीपी उमेश कुमार यांचे आगमन होताच त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.
त्यानंतर झालेल्या बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी जवळपास 195 कि. मी. अंतराच्या कर्नाटकच्या सीमेवर 22 पोलीस ठाण्यांच्या व्याप्तीमध्ये एकूण 72 गावे असल्याचे सांगितले. या ठिकाणी 24 तास पोलीस, महसूल, आरोग्य आणि गृहरक्षक कर्मचारी तैनात आहेत. सौंदत्ती यल्लामा देवी मंदिर, चिंचली मायाक्का मंदिर, गोकाक फॉल्स आणि अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी 144 कलमान्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे, असेही जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले.
कामासाठी महाराष्ट्रात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पासेस वितरित करा आणि त्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असले पाहिजे याची दक्षता घ्या, अशी सूचना यावेळी एडीजीपी उमेश कुमार यांनी जिल्हा पोलीस प्रमुख निंबरगी यांना दिली.
सीमावर्ती भागात कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी हलगर्जीपणा न करता आवश्यक गोष्टींची कठोर अंमलबजावणी करा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आईजीपी सतीश कुमार, बेळगाव पोलीस आयुक्त डाॅ. त्यागराजन, डीसीपी स्नेहा अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह एसीपी आणि डीएसपी दर्जाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.