एकेकाळी बेळगावचे जिल्हाधिकारी असणारे केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव प्रदीपसिंग खरोला यांनी काल शुक्रवारी सांबरा विमानतळाला भेट देऊन तेथील सेवांमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलांबद्दल प्रशंसोद्गार काढले.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बेळगावात नव्या विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रदीपसिंग खरोला यांनी विशेष सहकार्य केले आहे. जिल्हाधिकारी असताना बेळगावच्या सर्व समस्या त्यांनी प्राधान्याने सोडवल्या आहेत. त्यामुळेच सांबरा विमानतळाला त्यांनी काल शुक्रवारी खास भेट दिली.
प्रदीपसिंग खरोला यांच्या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. 25 वर्षांपूर्वी बेळगावचे जिल्हाधिकारी असताना सांबरा विमानतळावरील विमानसेवा खरोला यांनी पाहिली होती. पण आता या विमानतळावरील सेवांमध्ये क्रांतिकारी बदल झाल्याचे मत त्यांनी भेटीप्रसंगी व्यक्त केले. त्याकाळी या विमानतळावरून एखाद दुसरे विमान उड्डान व्हावयाचे, मात्र आता 20 हून अधिक विमानसेवा सुरू आहेत. ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. विमानतळाची सुधारणा, नवे मार्ग सुरू करणे, व्यापारी दृष्टिकोनातून विविध सेवा सुरू करणे, विमानतळ परिसरातील खुल्या जागेत वृक्षारोपण करणे असे विविध उपक्रम खरेच वाखाणण्याजोगे आहेत असे प्रदीपसिंग खरोला म्हणाले.
बेळगावात दोन फ्लाईंग स्कूल सुरू होत असून त्यांचे काम सुरू झाले आहे. फ्लाईंग स्कूलला विमानतळ प्राधिकरणाकडून आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जावी असे आवाहन करून प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहता फ्लाईंग स्कूलची योजना या ठिकाणी यशस्वी होईल असा विश्वास खरोला यांनी व्यक्त केला.
बेळगाव जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यामुळे बेळगावबद्दल आपल्याला विशेष प्रेम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भेटी प्रसंगी प्रदीपसिंग खरोला यांनी संपूर्ण विमानतळाची पाहणी केली. यावेळी विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी विविध सुधारणा आणि भावी योजनांबाबत खरोला यांना माहिती दिली.