गेल्या सव्वा वर्षापूर्वी सुरू झालेले आणि अलीकडे कांही महिन्यापासून ठप्प झाल्यामुळे नागरिकांसाठी मोठे त्रासदायक ठरण्याबरोबरच जीवघेण्या अपघाताला निमंत्रण देणारे टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे (आरओबी) बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण केले जावे, अशा मागणीचे निवेदन सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
सिटिझन्स कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे गेट हे शहराचे प्रवेशद्वार समजले जाते आणि या ठिकाणी गेल्या सव्वा वर्षापूर्वी 27.28 कोटी रुपये खर्चाच्या प्रशस्त रेल्वे ओव्हर ब्रिजच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर ब्रिजचे काम पूर्ण करण्याची मुदत गेल्या मार्च 2020 पर्यंत होती. मात्र अद्यापही हा ब्रिज बांधून पुर्ण झालेला नाही. गेल्या कांही महिन्यापासून तर येथील बांधकाम पूर्णपणे ठप्प आहे. ज्यामुळे शहरवासियांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. अलीकडेच नैऋत्य रेल्वेच्या डीआरएम हुबळी यांनी ट्विटरद्वारे येत्या मार्च 2022 अखेर या ब्रिजचे काम पूर्ण होईल असे स्पष्ट करून अलीकडे हे काम कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झाल्याचे सांगितले आहे. त्यांचे हे कारण न पटणारे आहे, कारण केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या आपल्या 2020 आणि 2021 च्या एसओपीमध्ये लॉक डाऊन काळामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कोणत्याही प्रकारचे बांधकाम बंद न करता सुरू ठेवावे, असे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी एका बाजूला प्रचंड लांबी रुंदीचा खोल खड्डा खणण्यात आला आहे. हा खड्डा मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत आहे. मंडोळी रोडवर वर्षभरापूर्वी ज्याप्रकारे एका इसमाचा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाला तसा किंवा त्यापेक्षा भीषण अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याखेरीज ब्रिजचे काम अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे रेल्वे जाताना गेट बंद होताच याठिकाणी कायम प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. हा गोव्याला जोडणारा राज्य महामार्ग आहे. या मार्गावर सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असून व्हीटीयुसह 5 मोठी प्रमुख महाविद्यालय आहेत. त्याचप्रमाणे तीन हॉस्पिटल्स आहेत. या सर्वांना रेल्वे ओव्हर ब्रिजच्या अर्धवट कामाचा मोठा फटका बसत आहे. शिवाय या ठिकाणी नित्य किरकोळ अपघात ठरलेले असतात. बर्याचदा रुग्णवाहिका पर्यायी मार्ग नसल्याने या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे पहावयास मिळाले आहे. तेंव्हा सदर रेल्वे ओव्हर ब्रिजच्या अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या कामामुळे सर्व थरातील नागरिकांना जो त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्याची गंभीर दखल घेऊन हा ब्रिज लवकरात लवकर बांधून पूर्ण करावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी सिटिझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी तिसऱ्या रेल्वे गेट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या रखडलेल्या बांधकामामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि मनस्ताप याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिली. त्या माहितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ थेट नैऋत्य रेल्वेच्या हुबळी येथील बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना चांगले धारेवर धरून कान उघाडणी केली.
तसेच दिवस-रात्र काम करून कोणत्याही परिस्थितीत येत्या ऑक्टोबर 2021 पर्यंत सदर ब्रिजचे काम पूर्ण करण्याचा आदेश त्यांना दिला. त्याचप्रमाणे अपघात आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आजच पोलीस आयुक्तांशी चर्चा करून तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी कायमस्वरूपी रहदारी पोलिस तैनात करण्याची व्यवस्था केली जाईल. शिवाय येत्या दोन दिवसात आपण स्वतः तिसऱ्या रेल्वे गेट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामाची पाहणी करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी दिले. याप्रसंगी सिटिझन्स कौन्सिलचे विकास कलघटगी, सेवंतीलाल शाह, ॲड. एन. आर. लातूर, अरुण कुलकर्णी, दीपक अवर्सेकर आदी सदस्य उपस्थित होते.