रामनगर, कंग्राळी खुर्द येथे काल बुधवारी दुपारी पित्याने आपल्या दोन मुलींना विष पाजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची आणि त्यामध्ये दोन्ही मुलीचा मृत्यू झाल्याची जी दुर्देवी घटना घडली ती करणीबाधा अर्थात अंधश्रद्धेत अडकून पडल्याने घडल्याचे उघड झाले आहे.
रामनगर, कंग्राळी खुर्द येथील अनिल चंद्रकांत बांदेकर या इसमाने आपल्या पोटच्या 8 वर्षे वयाची अंजली आणि 4 वर्षाची अनन्या या दोन कोवळ्या मुलींना विष पाजून स्वतःही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या प्रयत्नांमुळे तो जरी वाचला असला तरी दुर्दैवाने त्याच्या दोन्ही मुलींचा काल उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणी अनिल बांदेकर यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
पोलीस तपासात करणीबाधेच्या प्रकारातून सदर घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. घरासमोर आढळलेल्या करणीबाधेच्या उताऱ्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून अनिल बांदेकर यांची मानसिक स्थिती ढासळली होती.
गेल्या रविवारी सकाळी त्याने आपल्या घराचा दरवाजा उघडला, त्यावेळी घरासमोर पुन्हा एका बुट्टीत करणीबाधा उतारा ठेवल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे मनस्थिती अधिकच बिघडलेल्या अनिल याने आपल्या अंजली व अनन्या या दोन्ही मुलींना विष देऊन आणि स्वतः ही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.