बेळगाव जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खानापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मध्यावधी निवडणुका झाल्यास काँग्रेस त्यासाठी सज्ज असल्याचे म्हंटले आहे.
राज्यातील जनता त्रास व कष्टात असताना भाजपचे नेते मात्र खुर्चीसाठी भांडत आहेत. जनतेचे कष्ट यातना जाणून घेण्यास कोणीही वाली उरलेला नाही. आता राज्यातील मंत्रिमंडळ देखील अस्तित्वात नाही. जनतेचे सुख-दुःख जाणून घेणारे कोणीही नाही. येडियुरप्पा काळजीवाहू मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपमध्ये लोकशाही नाही. मध्यावधी निवडणुका होऊ नयेत असे आमचे मत आहे. मात्र भाजप सरकार कोसळले तर आम्ही मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असे स्पष्ट संकेत विरोधीपक्षनेते सिद्धरामय्या यांनी दिले.
येडियुरप्पा जनमतावर मुख्यमंत्री झाले होते, परंतु केंद्र सरकारने त्यांना खाली खेचली आहे. आता कांही झाले तरी 2023 ला राज्यात काँग्रेस सत्तेवर येणार आहे. भ्रष्ट सरकार पाडण्यास राज्यातील जनता सक्षम आहे. यापूर्वीही कर्नाटकच्या जनतेने ते केले आहे. राष्ट्रीय पक्षात हायकमांड असतो, राज्य कमांड असतो आणि जिल्हा कमांड देखील असतो. मात्र निजद पक्षामध्ये कोणता कमांड आहे? असा प्रश्न त्यांनी केला. त्या पक्षात फक्त एकच कमांड आहे असे सांगून सिद्धरामय्या यांनी निधर्मी जनता दलावर देखील टीका केली.
शंभर सिद्धरामय्या आले तरी भाजप त्याला प्रत्युत्तर देईल या टीकेला उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले की, 2013 मध्ये येडियुरप्पा यांनी अशीच टीका केली होती, मात्र तरीही काँग्रेस पक्ष सत्तेत आला होता. भाजपला कधी बहुमत मिळाले आहे का? 2008 असो 13 असो किंवा 2018 असो भाजपला कधीही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, असेही ते म्हणाले.
शशिकला जोल्ले यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, सध्या राज्यातील मंत्रिमंडळ अस्तिवात अस्तित्वात नाही. त्यामुळे स्टिंग ऑपरेशननंतर शशिकला जोल्ले यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावयास हवा होता किंवा येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावयास हवा होता. कारण भाजप सरकारच भ्रष्ट आहे, असा आरोप करून येत्या 2023 साली भ्रष्ट भाजप सरकारचा नायनाट होईल आणि काँग्रेस सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.