भारतीय सैन्य दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले कंग्राळी खुर्द गावातील सुभेदार मेजर यल्लाप्पा मारुती पावशे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संपूर्ण गावाच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार समारंभ आज शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला.
गावातील छत्रपती चौकामध्ये झालेल्या या जाहीर सत्कार समारंभात ग्रामपंचायतीसह गावातील अनेक संस्थाच्या मान्यवरांनी सुभेदार मेजर यल्लाप्पा पावशे यांचा मानाचा फेटा बांधून तसेच शाल श्रीफळासह पुष्पहार घालून सन्मान केला. याप्रसंगी पावशे यांच्या मातोश्रीसह पत्नी, मुले, सर्व कुटुंबीय, बंधू बाबू पावशे, शिवाजी बस्तवाडकर, एम. आर. पाटील आदींसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सुभेदार मेजर यल्लाप्पा पावशे यांनी विनम्रपणे आपल्या आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांच्याच आशीर्वादामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आपले बंधू बाबू पावशे व मित्र मंडळींचेही त्याने मनापासून आभार मानले. सत्कारानंतर यल्लाप्पा पावशे यांची छत्रपती चौकातून त्यांच्या घरापर्यंत सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली.
यल्लाप्पा मारुती पावशे हे गेल्या 24 डिसेंबर 1994 रोजी किल्ला येथील सैन्याच्या आर्टलरी विभागात भरती झाले आणि आर्टलरी सेंटर हैदराबाद येथे त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर 96 मेडियम रेजिमेंट आसाम मधून सैन्यदलाच्या सेवेत रुजू झालेल्या यल्लाप्पा पावशे यांनी गेली 26 वर्षे 6 महिने देशसेवा केली आणि काल गुरुवार दि. 30 जून 2021 रोजी ते सेवानिवृत्त झाले.
बिकानेर -राजस्थान, राजुरी, जम्मू -काश्मीर, ग्वालियर -मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, शांग्रीला -अरुणाचल प्रदेश आणि शेवटी गुजरात या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. शेवटी सुभेदार मेजर या उच्च पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत.