वडगाव येथील रयत गल्लीच्या कोपऱ्यावर दारू दुकान सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ नये, अशी जोरदार मागणी रयत गल्ली आणि बाजार गल्ली येथील नागरिकांनी केली असून तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि अबकारी आयुक्तांना सादर केले आहे.
रयत गल्ली आणि बाजार गल्ली, वडगाव येथील नागरिकांनी ॲड. प्रमिला विजयकुमार आणि शेतकरी नेते राजू मरवे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह अबकारी खात्याच्या आयुक्तांना सादर केले. वडगाव मेन रोडवरील मारुती वाईन शॉप हे दारूचे दुकान स्थलांतरित करून रयत गल्लीच्या कोपऱ्यावर सुरू केले जाणार आहे.
भरवस्तीत हे दारू दुकान सुरू झाल्यास त्याचा नागरिकांना त्रास होणार आहे. त्याचप्रमाणे या दारू दुकानाच्या परिसरात मंदिर आणि शाळा देखील आहे. याचीही गंभीर दखल घेऊन सदर दारू दुकान सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ नये. सदर दारु दुकानामुळे यापूर्वी या भागातील नागरिकांना विशेष करून महिलावर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. सदर वाईन शॉपमध्ये दारू ढोसून मद्यपी गल्लीतील घरांसमोर असभ्य वर्तन करत असतात.
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला मुलींची छेड काढणे, आपापसात भांडणे असे प्रकार मद्यपींकडून सुरू असतात. पूर्वी हे प्रकार वडगाव मेन रोडवर घडत होते, आता जर का रयत गल्ली कोपऱ्यावर दारू दुकान झाल्यास भरवस्तीत हे प्रकार सुरू होणार आहेत. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन सदर दारू दुकान सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ नये, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी ॲड. प्रमिला विजयकुमार, राजू मरवे, महादेव पाटील, मनोज लोहार, सुनिता लोहार, अरुण लोहार, रमेश चपले, बाळू राऊळ, शशिकांत राऊळ, आप्पय्या सपले, विनायक किल्लेकर, दिलीप संताजी, उदय कित्तूर आदींसह रयत गल्ली आणि बाजार गल्लीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.