शहरातील कणबर्गी रस्त्यावर आज सकाळी अपहरण झालेले रियल इस्टेट व्यवसायिक व उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर केवळ 4 तासातच सुखरूप घरी परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह हितचिंतकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शहरातील नामांकित रियल इस्टेट व्यवसायिक व उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर यांचे आज सकाळी महाराष्ट्र पासिंगच्या कारगाडीमधून आलेल्या अज्ञातांनी कणबर्गी रस्त्यावरील श्रुती अपार्टमेंटनजीक जबरदस्तीने अपहरण केले होते. त्यानंतर चार तासांनी म्हणजे आज दुपारी अपहरणकर्त्यांनी सोडून दिल्यामुळे भैरप्पनावर सुखरूप घरी परतले आहेत.
आज सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास आपले अपहरण करण्यात आल्यानंतर 4 तासांनी बेनकनहळ्ळी येथे अपहरणकर्त्यांनी आपली सुटका केली. मात्र तत्पूर्वी आपल्याला शिवीगाळ करून कांही कागदपत्रांवर आपली स्वाक्षरी घेण्यात आली असल्याचे मदन कुमार भैरप्पनावर यांनी पत्रकारांना सांगितले.
मदनकुमार यांच्या अपहरणाच्या घटनेमुळे शहरातील उद्योग जगत हादरले होते. तसेच रियल इस्टेट व्यावसायिकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र केवळ 4 तासातच भैरप्पणावर घरी सुखरूप परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह हितचिंतकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान हे अपहरण प्रकरण रियल इस्टेट व्यवहारातून घडले की अन्य कांही कारणामुळे? याचा पोलीस शोध घेत आहेत. मदनकुमार घरी सुखरूप परतल्याचे माहिती मिळताच माळमारुती पोलीसांनी त्यांच्या घरी धाव घेतली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.