कपिलेश्वर उड्डाणपुलावर गेल्या कांही दिवसांपासून पथदीपांअभावी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
कपलेश्वर उड्डान पुलावरील जवळपास सर्वच पथदीप गेल्या कांही दिवसांपासून बंदावस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. परिणामी पादचारी आणि वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पुलावरील भयान अंधारामुळे चोराचिलटांची भीती व्यक्त होत आहे. एकंदर रात्रीच्या वेळी गुडूप अंधारात असणारा कपलेश्वर उड्डाणपूल सध्या अपघात आणि गुन्हेगारीला आमंत्रण देणारा ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
तरी प्रशासनासह हेस्काॅमने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कांही बिघाड झाला असेल तर तातडीने दुरुस्ती करावी आणि रात्रीच्या वेळी कपलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.