गेल्या कांही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून आज बुधवारी सकाळी बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज सकाळी 11 वाजता बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपद व गोपनीयतेची शपथ देवविली. शपथविधीप्रसंगी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपचे केंद्र व राज्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते. कोण आहेत बसवराज बोम्मई? बी. एस. येडियुरप्पा प्रमाणे बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात.
आत्तापर्यंत गृहखाते, कायदा खाते, संस्कृती कार्यमंत्री अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी 61 वर्षीय बसवराज बोम्मई यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
मंगळवारी त्यांच्या नांवावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंग यांची बेंगलोरमध्ये भेट घेतली. त्याचप्रमाणे नांवावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी भाजपच्या 40 आमदारांनी देखील त्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.
आपल्या हातातील महत्त्वाची कामे वेळीच पूर्ण करा : मुख्यमंत्री बोम्मई
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ज्येष्ठ नेते माजी, मुख्यमंत्री बी.एयेडियुरप्पा यांच्या सहयोगाने काल भाजप आमदारांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पदाची निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर आपण सर्वप्रथम राज्यातील महत्त्वाच्या विषया संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. अशी माहिती कर्नाटक राज्याचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
यावेळी पुढे बोलताना बोम्मई म्हणाले,शपथविधी नंतर मंत्रिमंडळ रचनेची महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. मंत्रीमंडळात सर्व समाजांना सामावून घेण्याचे आपले लक्ष आहे. सरकारचे काम जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रामाणिकपणे आणि सांघिक रित्या चांगल्या रीतीने पार पडावे यावर आपला भर असेल. अधिकारी वर्गाला ही आपले कर्तव्य दक्षतेने पार पाडण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
महसूलात वाढ आणि खर्चात कपात यासंदर्भात सचिवांना सूचना देण्यात आले आहेत. आपल्या हातातील महत्त्वाची कामे वेळीच पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. सही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.