बेळगाव शहरात जागेची टंचाई असताना कपलेश्वर उड्डाणपुलाखालील मोकळी जागा पुलाच्या निर्मितीपासून रिकामी पडून आहे. तेंव्हा याकडे लक्ष देऊन संबंधीत वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या जागेचा जनहितार्थ सदुपयोग करावा, अशी मागणी केली जात आहे.
कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या निर्मितीपासून आजतागायत या पुलाच्या खालील बाजूला असलेली जागा रिकामी पडून आहे. आसपासचे नागरिक आणि व्यापारी या जागेचा आपली वाहने लावण्यासाठी ‘पार्किंग’ म्हणून उपयोग करत आहेत.
या ठिकाणी अत्यंत बेशिस्तीने गाड्या पार्क केलेल्या असतात. दुचाकींपासून कार आणि ट्रॅक्टर सारख्या वाहनांनी ही जागा व्यापलेली असते. या ठिकाणी असणारा रस्ता रोजचा वहिवाटीचा असल्यामुळे पार्क केलेल्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत असतो.पुलाखालील या लांब प्रशस्त जागेचा चांगला सदुपयोग करता येऊ शकतो असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.
शहरातील जागेची टंचाई लक्षात घेता या ठिकाणी भाजी मंडई, खाऊचा कट्टा यासारखे प्रकल्प राबवले जाऊ शकतात. शहरात रस्त्यावर किरकोळ भाजी विक्री करणाऱ्या भाजीविक्रेत्यांची संख्या अधिक आहे. शनि मंदिरापासून भावे चौकापर्यंतच्या मार्गावर बरेच भाजीविक्रेते रस्त्याकडेला भाजी विक्री करतात. या भाजी विक्रेत्यांसाठी कपलेश्वर उड्डाणपुलाखाली असलेल्या रिकाम्या जागेत छोटी छोटी दुकाने उभारुन दिल्यास ते त्यांच्यासाठी आणि नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे.
पुलाचा निवारा असल्यामुळे भाजीपाला मंडईचा प्रकल्प या ठिकाणी यशस्वीरीत्या राबविला जाऊ शकतो. तरी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याचा गांभीर्याने विचार करून संबंधित रिकाम्या जागेचा सदुपयोग करावा, अशी मागणी केली जात आहे.