बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारापासून नव्या कोर्ट कंपाउंडपर्यंत जाणाऱ्या भुयारी मार्गामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून या पाण्याचा त्वरित उपसा करून मार्ग ये -जा करण्यासाठी मोकळा करावा, अशी मागणी वकील वर्गाकडून केली जात आहे.
नुकत्याच मुसळधार पडलेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नव्या कोर्ट कंपाऊंडकडे जाणाऱ्या भुयारी मार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची पाणी साचले आहे. भुयारी मार्गात गेल्या चार -पाच दिवसापासून साचलेल्या या पाण्याकडे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढवून नागरिकांसह वकिलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या पावसाच्या दिवसात रस्ता ओलांडण्यासाठी हा मार्ग वकील आणि नागरिकांसाठी सोयीचा ठरत होता. मात्र आता तो पाण्यामुळे बंद झाला असल्यामुळे सर्वांची गैरसोय होत आहे. या शिवाय रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साचलेले पाणी उपसा करावं अशी मागणी केली जात आहे.
कांही वर्षांपूर्वी जिल्हाधिकार्यालयाच्याविरुद्ध बाजूला नव्या कोर्टाची उभारणी करण्यात आल्यानंतर वकिलांसह नागरिकांना चन्नम्मा सर्कलकडून आरटीओ सर्कलकडे जाणारा सततच्या रहदारीचा रस्ता ओलांडणे कठीण जात होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत होता, शिवाय अपघाताचा धोका वाढला होता. त्यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आला.
मध्यंतरी या मार्गाचा कोणीच वापर करत नसल्यामुळे तो धूळखात पडून होता. मात्र अलीकडे तातडीच्या कामासाठी वकील आणि नागरिकांकडून या भुयारी मार्गाचा वापर केला जात आहे. तथापी नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या भुयारी मार्गात सुमारे तीन-चार फूट पाणी साचले आहे. तरी या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्यास धोका निर्माण होण्यापूर्वी स्मार्ट सिटी अथवा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन पाणी उपसा करून भुयारी मार्ग नागरिकांना ये-जा करण्यासाठी खुला करावा, अशी मागणी वकील वर्गाकडून केली जात आहे.