Wednesday, June 26, 2024

/

‘माहेश्वरी’ चे अंध विद्यार्थी परीक्षेसाठी झाले सज्ज!

 belgaum

राज्यात उद्या 19 जुलैपासून प्रारंभ होणाऱ्या एसएसएलसी परीक्षेसाठी शहरातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांची त्यांच्या लेखणीकांसमवेत पूर्वतयारी करून देण्यात आली असून हे विद्यार्थी -विद्यार्थिनी उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत.

शहरातील नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी आपल्या लेखणीकांच्या मदतीने एसएसएलसी परीक्षा देत असतात. यंदाही या शाळेतील 26 अंध मुले -मुली उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेला बसणार आहेत. यंदा पहिल्यांदाच एसएसएलसी परीक्षा स्पर्धात्मक परीक्षेप्रमाणे ओएमआर शीटचा वापर करून घेतली जाणार आहे. त्यामुळे या पद्धतीचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील मुलांची त्यांच्या लेखणीकांसमवेत नुकतीच मॉक परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षार्थी आणि त्यांच्या लेखनीकांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. सदर सराव परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेचे अध्यक्ष विकास कलघटगी, सचिव प्रभाकर नागरमुन्नोळी, माहेश्वरी अंध शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे, वनिता विद्यालय हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शालिनी हुदली यांच्यासह माहेश्वरी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मुख्याध्यापिका अनिता गावडे म्हणाल्या की, एसएसएलसी परीक्षेत ओएमआर शीट हाताळण्याचा अनुभव मिळावा यासाठी आम्ही आमच्या शाळेतील परीक्षार्थींची त्यांच्या लेखणीकांसमवेत जय्यत तयारी करून घेतली आहे.Maheshwari

 belgaum

जेणेकरून ते आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील. माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील अंध मुला-मुलींना एसएसएलसी परीक्षेसाठी गेल्या 30 -32 वर्षापासून वनिता विद्यालय हायस्कूलचे सहकार्य लाभत आहे. या हायस्कूलच्या विद्यार्थिनी एसएसएलसी परीक्षेत आमच्या शाळेतील अंध विद्यार्थ्यांना लेखनिक म्हणून मदत करतात.

यंदादेखील वनिता विद्यालयाच्या 30 विद्यार्थिनी आमच्या शाळेतील परीक्षार्थींसाठी लेखनिकाची भुमिका बजावणार आहेत. या विद्यार्थिनी मन्नुर, गोजगे, मजगाव, बेनकनहळ्ळी, खादरवाडी आदी तालुक्यातील विविध भागातील आहेत. उद्याच्या परीक्षेला त्यांना ने-आण करण्यासाठी आम्ही वाहनांची व्यवस्था केली आहे.

यासाठी आम्हाला भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे विनोद दोडण्णावर आणि राजू दोडण्णावर यांचे गेल्या दोन वर्षापासून सहकार्य लाभत आहे असे सांगून यंदा लेखनिक विद्यार्थिनींच्या वाहतुकीसाठी भरतेश ट्रस्टकडून दोन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्याध्यापिका गावडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.