बेळगाव शहराच्या कॅन्टोन्मेंट हद्दीतील रेसकोर्स मैदान परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे सर्वत्र एकच घबराट पसरली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बेळगाव वन खात्याने कंबर कसली आहे.
हनुमाननगर येथील एमएलआयआरसी जे. एल. विंगच्या अखत्यारीत असणाऱ्या रेसकोर्स अर्थात गोल्फ मैदानावर नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या कांही लोकांना बिबट्याचे दर्शन झाले.
मैदानावर झाडीमध्ये बिबट्या दिसताच मॉर्निंग वाकर्सनी त्याबाबतची माहिती तात्काळ बेळगाव वन खात्याला दिली. सदर माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरेने रेसकोर्स मैदानाकडे धाव घेतली. मैदानावर दाखल झाल्यानंतर मॉर्निंग वाकर्सनी दाखविलेल्या ठिकाणी जाऊन वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बिबट्याच्या वावराच्या कांही खुणा आढळतात का याची तपासणी केली.
रेसकोर्स मैदान परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी हनुमाननगर परिसरात पसरताच नागरिकात एकच घबराट उडाली आहे. बेळगावच्या रेसकोर्स मैदानाला लागूनच अरण्य प्रदेश सुरू होतो. अलीकडे लाॅक डाऊनमुळे गोल्फ मैदान आणि संपूर्ण परिसरात नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ बंद झाली आहे या परिसरात कायम शुकशुकाट पसरलेला असतो.
हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्यामुळे या ठिकाणी भक्ष्याच्या शोधात बिबट्याचे आगमन झाले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने वेगवेगळी पाच शोध पथके स्थापन केली असून या पथकांनी रेसकोर्स मैदानासह आसपासचा सर्व परिसर पिंजून काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे वनाधिकाऱ्यांनी लवकरच त्या बिबट्याला शोधून जेरबंद केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.