महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढताहेत त्या दृष्टिकोनातून कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या नाक्यावर कडक तपासणी करण्यात येत आहे.निपाणी जवळील कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर पुण्याहुन कर्नाटकाकडे येणारी कर्नाटक परिवहन मंडळाची बस पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्यात आली. बस मधील एकही प्रवाश्यांकडे आर टी पी सी आर आणि लसीकरण प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून मंगळवारी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक एस व्ही शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या कर्नाटक महामंडळाच्या बसेसची कडक तपासणी केली.
कर्नाटक महामंडळाची बस पुण्याहून बेळगावला जात होती. या बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्याचा दाखला तपासणी करण्यात आला. सदर बस मध्ये एकही प्रवाशाकडे दोन्ही नसल्याने सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक महामंडळाची बस परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आली.सीमा तपासणी नाक्यावर अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. या ठिकाणी ट्रक चालक व अन्य वाहनधारकांचे रॅपिड तपासणी करण्यात येत होती.
सीमा तपासणी नाक्यावर अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी भेट देऊन महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्या सर्व वाहनधारकांची आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंध लस घेतल्याचा दाखला पाहूनच कर्नाटकात प्रवेश द्यावा. अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या सीमा तपासणी नाक्यावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रॅपिड तपासणी करण्यात येत आहे. रॅपिड तपासणीमध्ये निगेटिव्ह असणाऱ्या लोकांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
यावेळी डीवायएसपी मनोजकुमार नाईक, मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, पीएसआय एस ए टोलगी, पीएसआय विजय पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.