गेल्या एप्रिल व मे महिन्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्याचे अतिशय वाढले होते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग घटल्यामुळे जून महिन्यात बेळगाव महापालिका व्याप्तीमधील मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असून जूनमध्ये 362 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त आहे.
गेल्या एप्रिल व मे महिन्यात बेळगाव शहरात मृत्यूचे प्रमाण वाढले होते. एप्रिलमध्ये महापालिकेकडे 613 जणांची मृत्यू नोंद झाली होती. मे महिन्यात त्यात वाढ होऊन तब्बल 838 जणांचे मृत्यू नोंदविले गेले. मेमध्ये बेळगाव महापालिकेकडे रोज 27 जणांची मृत्यू नोंद झाली. बेळगावात एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला, त्याच स्थितीत बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर नाईट कर्फ्यू, मिनी लाॅक डाऊन, वीकेण्ड लाॅक डाऊन असे प्रयोग राबवले गेले.
कडक लाॅक डाऊन 27 एप्रिल पासून सुरू करण्यात आला. परंतु तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर झाला होता. त्याचे परिणाम मे महिन्यात पहावयास मिळाले मे मध्ये शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या व मृत्यूही वाढले. मे मध्ये शहरात ज्यांचे मृत्यू झाले त्याची नोंद महापालिकेकडे झाली. या महिन्यात 838 जणांची मृत्यू नोंद झाली, पण त्यापैकी किती जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला याची माहिती उपलब्ध झाली नाही.
आता जूनमध्ये कोरोनामुळे किती जणांचे मृत्यू झाले व कोरोनाची बाधा न झालेल्यांचे किती मृत्यू झाले याची स्वतंत्र नोंद महापालिकेने ठेवली आहे. त्यानुसार जूनमध्ये बेळगाव शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 249 इतकी आहे, तर नैसर्गिक आणि अन्य कारणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 113 इतकी आहे. थोडक्यात सरासरी रोज 12 मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त आहे. जूनच्या आरंभी शहरात मृत्यूचे प्रमाण जास्त होते. जूनच्या मध्यानंतर हे प्रमाण कमी होत गेल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दरम्यान 1 जून रोजी सर्वाधिक म्हणजे 36 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 17 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्याचप्रमाणे 3 जून रोजी 30 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 29 जण कोरोना बाधित होते. गेल्या 28 व 29 जून रोजी कोरोनामुळे केवळ एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उर्वरित दिवशी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एका पेक्षा जास्त आहे.