मुंबई दादर येथील कबूतर खाण्याच्या धर्तीवर बेळगाव शहरात कबुतरंसह सर्वच पक्षांसाठी अन्नछत्राचा अर्थात खाद्य उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या हेल्प फाॅर नीडी संघटनेच्या माध्यमातून मुंबईचे पण आता बेळगावात स्थायिक झालेले पक्षीप्रेमी राज बोराणा यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे.
अलीकडच्या काळात विकासाच्या नांवाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतच आहे शिवाय पशुपक्ष्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्षे मुंबईला स्थायिक असणारे मात्र आता कायमस्वरूपी बेळगावला आलेल्या पक्षीमित्र राज बोराणा यांना मुंबईतील ‘कबूतर खाना’ प्रमाणे बेळगाव शहरात पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय असणारे ठिकाण नसल्याचे लक्षात आले.
यासंदर्भात त्यांनी हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्याशी चर्चा केली आणि या उभयतांनी मुंबई कबूतरखाण्याची संकल्पना बेळगावात राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोघांनी गेल्या 1 जुलैपासून शहरातील सदाशिनगर स्मशानभूमी आणि सिव्हील हॉस्पिटल शवागारा समोरील जागेत पक्ष्यांना खाद्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
सदाशिवनगर येथील कबूतर खाण्याच्या ठिकाणी सध्या जवळपास 100 -200 कबुतरे तसेच कावळे, चिमण्या यांच्यासह विविध पक्षी खाद्य टिपण्यासाठी येतात. सिव्हील हॉस्पिटलच्या ठिकाणी तर खारुताई देखील बागडताना दिसतात, असे अनगोळकर यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले.
पक्ष्यांना खाद्य पुरवण्याच्या आपल्या उपक्रमाची अधिक माहिती देताना सुरेंद्र अनगोळकर म्हणाले की, राज बोराणा यांच्या कल्पनेतून आम्ही हा उपक्रम सुरू केला असून बोराणा यांनी पक्ष्यांना काय, कसं खाऊ घालायचं वगैरे संबंधित सखोल माहिती मला दिली आहे. शिवाय प्रारंभी पक्ष्यांसाठी धान्य देखील त्यांनीच पुरवले असून हा उपक्रम राबविण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. शिवाय उन्हाळ्यात पक्षांना किडे वगैरे खाद्य मिळते पण पाणी मिळत नाही आणि पावसाळ्यात पाणी मिळते परंतु खाद्य मिळत नाही, हे लक्षात घेऊन आम्ही दोघांनी हा उपक्रम सुरू केला आहे त्यानंतर आम्ही दोघे मिळून स्वखर्चाने खाद्य खरेदी करून पक्ष्यांना खाऊ घालत आलो आहोत. मात्र आता धान्य व्यापाऱ्यांनीही या कामी आम्हाला सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे.
सोमनाथ ट्रेडिंगचे गणेश चौगुले यांनी धान्य देण्यास सुरुवात केली असून त्यांनी या उपक्रमासाठी अन्य व्यापार्यांकडून पक्ष्यांसाठी धान्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही पक्ष्यांसाठी टाकलेले खाद्य तासाभरात संपूण जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या पक्षी येत आहेत. सदाशिवनगर स्मशानभूमीच्या ठिकाणी कावळ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणच्या खाद्यामध्ये आम्ही बदल केला असून पापडी वगैरे कावळ्यांना आवडते खाद्य आम्ही त्याठिकाणी टाकत आहोत. मात्र स्मशानभूमीत रक्षा विसर्जनाचे विधी होत असल्यामुळे याठिकाणी सोमवार आणि गुरुवारी सकाळी अकरापर्यंत आम्ही कावळ्यांना कांहीही खाऊ घालत नाही, असेही सुरेंद्र अनगोळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सदाशिवनगर स्मशानभूमी सुधारणा मंडळाचे सदस्य माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी सुरेंद्र अनगोळकर व राज बोराणा यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत. राज बोराणा यांच्या प्रेरणेतून माझे मित्र सुरेंद्र अनगोळकर यांनी पक्षीप्रेमी उपक्रम सुरू केल्याबद्दल सदाशिनगर स्मशानभूमी सुधारणा मंडळाच्यावतीने मी या दोघांचे अभिनंदन करतो, असे मोरे म्हणाले. याप्रसंगी सुरेंद्र अनगोळकर, यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या गौरी गजबर, माधुरी पाटील व इतर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे या बेळगावच्या कबुतर खान्या बद्दल काय म्हणाले?क्लिक करा खालील लिंक
https://www.instagram.com/tv/CRTidiMBZpv/?utm_medium=copy_link