रामतीर्थनगर येथे मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा वारंवार मागणी करून देखील हटविला जात नसल्याने संतप्त स्थानिक युवकांनी तेथील कचरा चक्क महापालिकेसमोर आणून टाकल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली.
रामतीर्थनगर येथील खुल्या जागेत अलीकडे मोठ्या प्रमाणात केरकचरा आणि दारूच्या बाटल्या टाकण्यात येत आहेत. प्रचंड प्रमाणात साचलेल्या या कचऱ्यामुळे या भागात दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
त्याचप्रमाणे कचरा आणि घाणीमुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढण्याबरोबरच रामतीर्थनगर येथील वातावरण दूषित झाले आहे. परिणामी नागरिकांच्या विशेषकरून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात साचलेल्या या कचरा व घाणी संदर्भात वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नव्हती.
परिणामी संतप्त झालेल्या लोकनाथ रजपूत, रोहित मुरकुटे, प्रसाद मोहिते व विनायक खांडेकर या स्थानिक युवकांनी 4 -5 पोती कचरा पोत्यात भरून आज सकाळी तो महापालिकेसमोर आणून टाकला आणि रामतीर्थनगर येथील साचलेला कचरा हटविण्याची मागणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवत आहेत. बेळगावात मात्र या उलट चित्र दिसत आहे. केरकचऱ्यामुळे बेळगाव स्मार्ट सिटी होण्याऐवजी गचाळ सिटी होत आहे. वारंवार तक्रार करून देखील रामतीर्थनगर येथील कचऱ्याची उचल करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तेंव्हा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खास करून बेळगाव उत्तरच्या आमदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच संबंधित कचऱ्याची तात्काळ उचल करून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी लोकनाथ रजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.