बेळगाव महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आज शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हरकती आणि आक्षेपांची दखल घेऊन यादीत आवश्यक बदल करण्याद्वारे ही अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.
शहरातील 58 प्रभागांची मतदार यादी महापालिकेने गेल्या 28 जून 2021 रोजी प्रसिद्ध केली होती. त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी 1 जुलै 2021 पर्यंतची मुदत दिली होती. सदर मतदार यादीवर 30 हरकती आल्या होत्या. ज्या हरकती योग्य आहेत, त्याची दखल घेऊन यादीत बदल करण्यात आला आहे. अ आक्षेप किंवा हरकती नोंदविण्यासाठी 1 जुलै ही अंतिम तारीख होती तरी देखील त्यानंतर दाखल झालेल्या हरकतींची दखल महापालिकेने घेतली आहे. आज जाहीर करण्यात आलेली अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका कार्यालय आणि महापालिका कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शहराची प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम गेल्या 28 एप्रिलपासून सुरु झाले होते. तथापी कोरोना आणि लाॅक डाऊनमुळे ते काम रखडले होते. महापालिकेच्या महसूल विभागातील काहींना कोरोना संसर्ग झाल्यामुळे कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेने निवडणूक आयोगाकडे केली होती.
निवडणूक आयोगाने जून महिन्यात त्याची दखल घेतली व नवे वेळापत्रक जाहीर केले. सरकारने सर्व नगर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 6 महिने लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे अंतीम मतदार यादी तयार झाली असली तरी आता लगेच निवडणूक होणार नाही हे देखील तितकेच खरे आहे.