एकसंबा परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरातून दोघांना वाचवण्यात यश आले असले तरी त्यांची दुचाकी मात्र वाहून गेल्याची घटना काल सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
काल शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस असल्याने एकसंबा -सदलगा मुख्य मार्गावरील ओढ्याच्या पात्राला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच येथील मराठी शाळेमागील मार्गही बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ओढ्यावरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून दोघात दुचाकीस्वारांनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांची दुचाकी पुरात वाहून गेली. प्रसंगावधान राखून उपस्थित लोक मदतीला धावून गेल्यामुळे सुदैवाने दोघाही दुचाकीस्वारांची प्राण वाचू शकले. एकसंबा गावकऱ्यांकडून ओढ्यावरील पुलावर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे सांगण्यात येत आहे. पुरामुळे ओढ्या शेजारील घरे, रस्ते आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.