आगामी श्री गणेशोत्सवाची नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाने लावून धरल्यामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याबाबत विचार विचारविनिमय करण्यासाठी गेल्या सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
श्री गणेशोत्सवा संदर्भातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह महापालिका आयुक्त जगदीश के. एच., पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत गणेशोत्सव नियमावलीबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. एकंदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशोत्सवात निर्बंध अधिक कडक होण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेनंतर प्रशासनाने तिसरी लाट पसरू नये यासाठी आत्तापासून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची भेट घेऊन गणेशोत्सव बाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली होती. तसेच गणेशोत्सवाबाबत महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या नियमांची माहिती मराठीतून भाषांतर करून जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानंतर प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून मध्यवर्ती महामंडळाने गणेशोत्सव नियमावली लवकर जाहीर करावी जेणेकरून गणेश उत्सव कशा प्रकारे साजरा करावा याची माहिती मंडळाने मिळेल, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे प्रशासनाला गणेशोत्सवाबाबतची नियमावली लवकर जाहीर करावी लागणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाबाबत चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची बैठक उद्या गुरुवार दि. 15 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता बोलावली आहे. शहरातील शनिमंदिर नजीकच्या श्री सिद्धजोगेश्वर मंदिरामध्ये ही बैठक होणार असून संबंधीत सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण -पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि सचिव शिवराज पाटील यांनी केले आहे.