गतिमंद मुले जन्माला आली की त्यांची निगराणी करण्याचे आव्हान त्यांच्या पालकांना सोसावे लागते. त्या विशेष मुलांची निगा राखताना अनेकजण मेटाकुटीला येतात.
त्रासतात आणि अनेकदा जीवाला कंटाळतातही. मात्र बेळगावला येऊन अशा मुलांना दत्तक घेण्याचे महान काम अमेरिकेतील दोन जोडप्यांनी केले आहे. माणुसकीचे दर्शन घडविण्यासाठी लांबचा विमानप्रवास करणारी ही जोडपी देवदूतच ठरली आहेत.
श्री ब्राडी आणि श्रीमती डेंनी मुल्डर तसेच श्री अँड्र्यू आणि श्रीमती नाना रॉबिन्सन अशी या जोडप्यांची नावे आहेत. विवेकानंद सेवा प्रतिष्ठान च्या दत्तक केंद्रातून त्यांनी दोन विशेष मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया पार पाडली.
पालकांना नकोश्या झालेल्या मुलांचा या केंद्रात सांभाळ केला जातो.अनेक पालक आपल्या विशेष मुलांची स्वतःला काळजी घेता येत नाही म्हणून या ठिकाणी सोडून जातात.मात्र अशा मुलांना दत्तक घेण्यासाठी विदेशी जोडप्यांनी येणे हा नवीनच आणि माणुसकीचे दर्शन घडविणारा प्रकार पाहायला मिळाला आहे.
दत्तक घेणे हे भारतात नवीन नाही. आपला धर्म,इतिहास आणि संस्कृतीने दत्तक घेण्याची अनेक उदाहरणे दाखवून दिली आहेत. मात्र मुले न होणे या प्रकारात अनेकजण धडधाकट मुलांना आपलंसं करून दत्तक प्रक्रिया पूर्ण करतात.
अमेरिकन जोडप्यांनी विशेष मुलांना दत्तक घेऊन एक नवीन आदर्श घालून दिला आहे.
डॉ मनीषा भांडणकर,स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि डीसीपी विक्रम आमटे यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात मोलाची भूमिका निभावली आहे.कुटुंब रक्ताने बनत नसते तर ते प्रेमाने बनते असे उदाहरण या घटनेने घालून दिले असल्याची माहिती या घटनेत प्रत्यक्ष सहभागी किरण निप्पाणीकर यांनी बेळगाव live ला दिली.