बेळगाव महापालिकेच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात न्यायालयासमोर आज बुधवारी 2 जून रोजी होणारी सुनावणी आणखी दोन आठवडे लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती खटल्यातील वादी माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कोणताही बदल न करता पुन्हा 2018 सालची वादग्रस्त प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आल्यामुळे त्याच्याविरोधात माजी नगरसेवकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. प्रारंभी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर सरकारी वकिलांनी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यावर आक्षेप घेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मागितली होती. तत्कालीन कालावधीत प्रभाग आरक्षणाबाबत जारी होणारी अधिसूचना या बाबी लक्षात घेऊन न्यायाधीशांनी प्रारंभी दोन आठवड्यानंतर दाव्याची अंतिम सुनावणी करण्यात येईल असे सांगितले होते.
पुढे न्यायालय सुरू झाल्यानंतर माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांच्या वकिलांनी कैफियत दाखल केली होती. त्यानंतर गेल्या 4 मार्च रोजी या दाव्याची सुनावणी होणार होती. तथापि सदर दावा न्यायालयासमोर वेळेवर न आल्यामुळे सुनावणी 23 मार्च त्यानंतर 5, 19, 22 व 23 एप्रिल अशी पुढे ढकलण्यात आली होती.
सरकारी वकिलांनी 23 एप्रिल रोजी सुनावणीसाठी वेळ मागून घेतल्यामुळे त्यानुसार दुसऱ्या दिवशी न्यायालयीन कामकाज सुरु देखील करण्यात आले. मात्र लगेच न्यायालयाची उन्हाळ्याची सुट्टी सुरू होत असल्याने त्या दिवशीही अंतिम अंतिम सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही.
त्यामुळे न्यायालयाने जूनच्या पहिल्या आठवड्यात दाव्याची फुलफ्लेज अर्थात संपूर्ण अंतिम सुनावणी होईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज 2 जून 2021 रोजी सुनावणी होणार होती, मात्र ती आणखी दोन आठवडे लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी दिली.